सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सातारा बंदची हाक देण्यात आली आहे. काल कराड येथे सकाळ मराठा समाज बांधवांकडून विराट मोर्चा काढून आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यात आला. दरम्यान, काल माण तालुक्यात देखील गावोगावी बंद पाळत उपोषणे, आंदोलने करण्यात आली. या दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गोंदवले बुद्रुक मध्ये एका एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या तर महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थी पेपर देण्यास नकार दिला. तर मार्डी येथे सुमारे 50 जणांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला. या घटनांमुळे मराठा आरक्षण प्रश्नी सुरु असलेल्या आंदोलनाला एक प्रकारे हिंसक वळण लागल्याचे दिसून आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षण प्रश्नी सातारा जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासून सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक, दहिवडी, मार्डी, रानंदमध्ये देखील कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या दहिवडी शहरात सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून दहिवडी आगाराने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद केलेले आहे.
दरम्यान, काल दहिवडी शहरात असलेल्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू असलेल्या परीक्षेचे पेपर न देण्याचा निर्णय घेतला. तसेच आरक्षण नाही तर पेपर नाही देणार अशा पद्धतीच्या घोषणा विद्यार्थ्यानी दिल्या. यामुळे हे आंदोलन आता तीव्र स्वरूपाचे व्हायला लागले आहे.