दंगलीनंतर पुसेसावळीतील जनजीवन पूर्वपदावर; मात्र, मोठा पोलिस बंदोबस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टवरून झालेल्या दंगलीनंतर विस्कळित झालेले पुसेसावळी येथील जनजीवन प्रशासनाच्या प्रयत्नानंतर काल गुरुवारपासून पूर्वपदावर येऊ लागले आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने काहीअंशी तणाव दूर होण्याबरोबरच आर्थिक उलाढाल सुरू झाली.

गणेशोत्सवास अवघे चार दिवस उरले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळी येथील गणेशमूर्ती व्यावसायिकांनी आपले स्टॉल तसेच गणपती सजावटीच्या साहित्याची दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

पुसेसावळीबरोबरच जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करत प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच शांतता पूर्वक राहण्याचे आवाहन केले त्यास पुसेसावळीकरांनी प्रतिसाद दिला. चौथ्या दिवशी शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

ऑनलाइन स्वरूपातील व्यवहार सुरू झाले असून, ई बिल, चेक क्लिअरन्स प्रक्रिया सुरू झाल्याने व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना दिलासा मिळाला. शाळा सुरू झाल्यामुळे पालकांनी आपापल्या पाल्यांना आज शाळेत पाठवले. गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेली बॅंक सेवा सुरू झाल्यामुळे अनेकांनी बॅंकिंगसंदर्भात कामे उरकण्यावर भर दिला. दरम्यान, पोलिस बंदोबस्त आजही कायम ठेवण्यात आला आहे.