सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर फलटण तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे व शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी सुद्धा आपल्या पदाचे राजीनामे हे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्याकडे दिले आहेत.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण हे उद्या, दि. 14 रोजी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आपल्या पदाचा राजीनामा देत श्रीमंत संजीवराजे यांच्यासोबत पक्षांतर करणार आहेत.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार दीपक चव्हाण, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर संजीव राजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी 14 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यामध्ये तुतारी चिन्हाच्या सोबत जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे