एकास धडक दिलेली कार अचानक कोसळली कालव्यात; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या महामार्गावर चार चाकी वाहनांचे अपघात होण्याच्या घटना वाढत आहे. दरम्यान, आज पुणे- सातारा महामार्गावर खंडाळा तालुका हद्दीत एका भरधाव वेगाने पुण्याहून सातारच्या दिशेकडे निघालेल्या कारने एका युवकाला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार धोम कालव्यात जाऊन कोसळली. यावेळी स्थानिकांनी प्रसंगावधान राखत कालव्यातील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाणाऱ्या कारमधील लोकांना वाचविले तर कारच्या धडकेत जखमी झालेल्याला उपचारासाठी दवाखाण्यात दाखल केले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील पुणे- सातारा महामार्गावरून खंबाटकी घाट मार्गे पुण्याहून डफळपूर ता. जत या ठिकाणी राहुल भाग्यवंत उबाळे (वय 25) व अविनाश भाग्यवंत उबाळे (वय 29) हे दोघे निघाले होते. यावेळी ते दोघे लघुशंकेसाठी कॅनॉलजवळ थांबले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेली कार (क्र.MH 12 TY1066) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने राहुल उबाळे यांना जोराची धडक दिली. यानंतर कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली.

अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. यानंतर कारमधील चालक श्रीपती श्रीमंत शिंदे (वय 42), श्रीमंत शिंदे (वय 70), राजश्री श्रीपती शिंदे (वय 37), संकेत श्रीपती शिंदे (वय 13), संस्कृती श्रीपती शिंदे (वय ८, सर्व रा.अथनी, ता.बेळगाव, सध्या रा. पुणे) या पाच जणांना कालव्यात कोसळलेल्या कारमधून बाहेर काढले.

या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या राहुल उबाळे यांच्यासह बुडालेल्या कारमधील अपघातग्रस्तांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी राजु अहिरराव, पो. हवा. विजय पिसाळ, चालक दत्तात्रय धायगुडे, पो. नाईक अतुल आवळे, पो. हवा. पंडित, पो.ना. सचिन शेलार, पो. हवा. उद्धव शिंदे व कर्मचारी, हायवे पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर अपघाताबाबत अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहेत.