सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका हद्दीत काशीळ येथे अज्ञात 9 दरोडेखोरांनी दोघांकडून सुमारे 17 लाख 62 हजार किमतीचे एकूण 110 ग्रॅम सोन्याचे दागिने व 17 किलो चांदीचे दागिने लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल व रक्कम फिर्यादीच्या ताब्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २८ मे २०२३ रोजी रात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास काशिळ, ता. जि. सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरून एक चारचाकी गाडी क्रमांक (MH43 BP8427) ही जात असताना दुसरी कार क्रमांक (MH6BM 3715) मधील चालकाने अचानक आडवी मारुन गाडी थांबवली. इनोव्हा कारमधुन अनोळखी इसम व दुचाकीवरून आलेले अनोळखी इसमांनी फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार गोलुसिंग दिनेशसिंग परमार यांच्या तोंडावर स्प्रेचा फवारा मारुन जबरदस्तीने खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडी क्रमांक (MH43 BP8427) घेऊन त्यामधील 17 लाख 62 हजार किमतीचे एकूण 110 ग्रॅम सोन्याचे दागिने व 17 किलो चांदीचे दागिने असलेल्या कुरिअर पार्सलचे बॉक्स जबरदस्तीने हिसकावून नेले.
यानंतर संतकुमारसिंग पुरणसिंग परमार (वय २५, मुळ रा. जारगा ता. बसेडी जि. धौलपुर राज्य राजस्थान, सध्या रा. २१६, भेंडीगल्ली, शिवाजी चौक, कोल्हापुर) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद दिली. त्यानंतर अज्ञात दरोडे खोरांविरोधात गु.रजि. नं.२०० / २०२३ भा.दं.वि. कलम ३९५,३४१,३३६ प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर सदर गुन्ह्यातील अनोळखी ९ आरोपींचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी शोध घेतला. कालांतराने आरोपीची गोपनिय माहिती मिळालयानंतर त्यांना सापळा लावुन ताब्यात घेतले. तसेच आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल १९ लाख ८४ हजार २५५ रुपयांचा किंमतीची १२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १८.७०० किलोग्रॅम चांदीचे दागिने हा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार राजकिशोर मास्टरसिंह परमार (रा. रैवियापुरा ता. बसेडी जि. धौलपुर राज्य राजस्थान, सध्या रा. २१६, भेडीगल्ली, शिवाजी चौक, कोल्हापुर) यांच्या ताब्यात देण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपाधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, पो.कॉ. विशाल जाधव, मुद्देमाल कारकुन म.पो.ना. नम्रता जाधव, मोना निंबाळकर यांनी केली आहे.