कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज येथील नीलम तानाजी शिंदे या तरुणीचा १४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत भीषण अपघात झाला. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेली नीलम अपघातानंतर कोमात गेली असून तिच्यावर कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटोच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृत्यूच्या दारात असलेल्या लेकीला पाहण्यासाठी वडिलांना इमर्जन्सी व्हिसा हवा आहे. त्यासाठी त्यांची सरकार दफ्तरी आणि राजकीय नेत्यांकडे धावाधाव सुरू आहे.
गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये नीलम शिंदे ही शिक्षण घेत आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी ती इव्हिनिंग वॉकला गेली असताना पाठीमागून एका कारनं तिला जोराची धडक दिली. अपघातात तिच्या दोन्ही हात, पाय आणि डोक्याला गंभीर इजा झाली. छातीला मार लागल्यानं ती कोमात गेली आहे. तिच्यावर सध्या कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटोमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताच्या घटनेला १३ दिवस झाले असून मुलगी मृत्यूच्या दारात आहे. रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय कॅलिफोर्नियातील रुग्णालय प्रशासनाला कोणतीही रिस्क घेता येईना. तसेच पोलिसांना देखील गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात कायदेशीर अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत लेकीला पाहण्यासाठी तानाजी शिंदे यांची इमर्जन्सी व्हिसासाठी धावाधाव सुरू आहे.
केंद्र सरकारने नीलमच्या अपघाताच्या घटनेचे गांभीर्य ओळखून वडिलांच्या व्हिसासाठी प्रयत्न करावा : माजी खासदार श्रीनिवास पाटील
उंब्रज येथील नीलम तानाजी शिंदे या तरुणीचा १४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत भीषण अपघात झाल्यानंतर १५ रोजी नीलमच्या चुलत्यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आम्ही नीलम शिक्षण घेत असलेल्या युनिव्हर्सिटीमहिला डीनशी ईमेल करून संपर्क केला व माहिती घेतली. त्यानंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या ऑफिसशी संपर्क साधून विभूतीनाथ पांडे यांना ईमेल करून नीलमची मैत्रीण ख़ुशी व वडिलांचा संपर्क क्रमांक पाठवून त्यांच्याबाबत युनिव्हर्सिटी व मंत्र्यांच्या ऑफिसला माहिती दिली व लवकव्हिसा देण्यात यावा अशी मागणी केली. आता केंद्र सरकारने केंद्रीय पातळीवर लक्ष घालून वडिलांना लवकरात लवकर व्हिसासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.
श्रीनिवास पाटील व मंत्री मोहोळ यांचे व्हिसासाठी प्रयत्न…
नीलमचे वडिल तानाजी शिंदे यांनी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार तथा सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन इमर्जन्सी व्हिसासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पातळीवर प्रयत्न करण्याची विनंती केली. श्रीनिवास पाटील यांनी तातडीनं मेल करून परिस्थितीचे गांभीर्य परराष्ट्र मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावत तातडीनं इमर्जनी व्हिसा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.