कराड प्रतिनिधी | अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने रयत सहकारी साखर कारखाना चालवला आहे. आता रयत कारखाना पूर्णपणे कर्जमुक्त झाला असून यंदापासून रयत कारखाना प्रतिदिन ५ हजार मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. तसेच रयत कारखाना १४ मेगावॉट वीजनिर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवाळेवाडी-म्हासोली (ता. कराड) येथील रयत कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष अप्पासाहेब गरुड, ‘अथणी-रयत’चे युनिट हेड रवींद्र देशमुख, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बळवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप करून गाळपास आलेल्या उसाला एक रकमी प्रतिटन २९२५ इतका तालुक्यात उच्चांकी दर दिला आहे. येत्या हंगामात ७ लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळप करण्याचे कारखाना व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे. सभासद, शेतकऱ्यांनी सहकार्य सहकार्य करण्याचे आवाहन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.
प्रारंभी रयत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, लोकनेते दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शैलेश देशमुख यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेस जयवंतराव मोहिते, बाजीराव शेवाळे, पी. बी. शिंदे, प्रशांत पाटील, अर्जुन पवार, आनंदराव पाटील, आत्माराम देसाई, शशिकांत साठे, जयवंतराव बोंद्रे, जगन्नाथ माळी, तुकाराम काकडे, हिम्मत पाटील, पंजाबराव देसाई, विजया माने, रमेश देशमुख, प्रकाश पाटील, किसनराव जाधव, दीपक पिसाळ, हणमंतराव चव्हाण यांच्यासह सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.