सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर राज्य सरकारच्या वतीने स्थगिती देण्यात आलेली होती. त्यानंतर कारखान्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या या सदोष असून, सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक मतदार याद्यांमध्ये विविध गोष्टींचे समावेश केलेला नाही. त्यामुळे श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी राज्य सरकारकडे केलेली होती. त्यासोबतच विश्वासराव भोसले यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही पारदर्शीपणे संपन्न होऊन जे सभासद आहेत, त्या सर्व सभासदांचे मूलभूत अधिकार हे त्यांना मिळावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठीच आम्ही राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करीत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेली होती.