सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने आज जिल्हा परिषदेची ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये खरीप हंगामात अनुदानावर बियाणेसाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समितीत ३० लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली.
सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने यावर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अनुदानावर बियाणे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, वाटाणा, घेवडा आदींचे बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाच्या अर्चना वाघमळे, महिला व बालकल्याणच्या रोहिणी ढवळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या क्रांती बोराटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोदी, राहुल अहिरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गाैरव चक्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुण दिलपाक, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी उपस्थित होते.
या सभेत सुरुवातीला १६ मार्च रोजी झालेल्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. तसेच झालेल्या ठरावांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये कृषी विभागाकडील बियाणे अनुदान योजनेलाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद सेस अंतर्गत कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देण्यात येतात. यामध्ये अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला अन् दिव्यांग आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहेत. यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.