सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात ऊसासह अनेक पिके घेतली जातात. या पिकांमध्ये आता बांबू या पिकाची देखील अधिक भर पडली आहे. जिल्ह्यात बांबू लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे. या वर्षासाठी 5 हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू केले आहे. 3 हजार 339 हेक्टर क्षेत्रावरील लागवडीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 70.54 हेक्टरवर बांबू लागवड पूर्ण झाली आहे.
सातारा जिल्ह्यात एकूण 1 हजार 744 गावे असून प्रत्येक गावात 2 हेक्टरप्रमाणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बांबू लागवडीचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रत्येक कृषी सहायकाला 10 हेक्टर तर प्रत्येक ग्रामसेवकाला 10 हेक्टरचे उद्दिष्ट दिले आहे. यानुसार कृषी विभागाकडे 1776, सामाजिक वनीकरण 65 हेक्टर, गटविकास अधिकारी जिल्हा परिषद यांना 2017 हेक्टर असे एकूण 3558 हेक्टरचे प्रस्ताव प्राप्त जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.
यापैकी 3339 हेक्टरवरील प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे. तर आतापर्यंत 70.54 हेक्टरवर बांबू लागवड पूर्ण झाली आहे. त्यासाठी 76 हजार 629 बांबू रोपांचा वापर करण्यात आला आहे. आता सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई असल्याने बांबू लागवडीवर याचा परिणाम दिसणार आहे. आता जूनमध्येच बांबू लागवड करावी लागणार आहे.
असे मिळणार अनुदान
सध्या पाण्याची उपलब्धता नसल्याने लागवड केलेली बांबू रोपे जगविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. बांबूलागवड दहा गुंठ्यांपासून एक हेक्टरपर्यंत करता येते. त्यासाठी मनरेगाअंतर्गत हेक्टरी 6 लाख 99 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.