सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता मोहीम घेत ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. मात्र, अजून काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असून प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याने यावर बंदी घालण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी गाव व तालुका स्तरावरील पथकाची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांनी नुकत्याच दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली स्वच्छता विभागाची बैठक 4 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या अनुषंगाने एक महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये स्वच्छता सातत्य राखण्यासाठी गाव स्तरावर 1148 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून 468 प्लास्टिक विक्रेते दुकानदार व उघडा वरती कचरा फेकणारी व्यक्ती यांच्यावर कारवाई करून 62,502 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 7586 विक्रेते व लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
गाव स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत 1332 गावांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी 298 ग्रामपंचायत यांनी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत व त्या व्यक्तींच्याकडून दंड वसूल करणे यावा पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या आहेत.