सातारा प्रतिनिधी | म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी देवस्थानची रथ मिरवणूक यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यात्रेच्या उपाययोजनांची माहिती घेतली. रथोत्सव सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारी पार पडाव्यात. कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
यावेळी आढावा बैठकीस प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, माणचे तहसीलदार विकास अहिरे, म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिन माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, श्री सिद्धनाथ देवस्थान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष वैभव गुरव, विश्वस्त, मंदिराचे सालकरी महेश गुरव, रथाचे मानकरी राजेमाने कुटुंब माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, रथ ओढणारे माळी समाज मानकरी, मंदिराचे डुबल मानकरी यासह शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत जितेंद्र डुडी यांनी प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावा घेतला.
डुडी म्हणाले, ”येथील यात्रेपासूनच जिल्ह्यातील यात्रांचा हंगाम सुरू होत असल्याने म्हसवड यात्रेत प्रशासनाने काय व्यवस्था केली? याची चर्चा जिल्हाभर सुरू असते. त्यामुळेच म्हसवडची सिद्धनाथ यात्रा यंदा आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.” याशिवाय यात्रेसंदर्भात यापूर्वी माणच्या प्रशासनाने बैठक घेऊन सर्व विभागांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास मात्र संबंधित विभागावर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
या यात्रेची मुख्य जबाबदारी ही म्हसवड पालिकेची असल्याने यात्रा कालावधीत पालिकेला आणखी काही तात्पुरते कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले, तर आरोग्य विभागाने प्रत्येक एक किलोमीटरवर एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्याची व पालिका इमारतीशेजारी एक तात्पुरते रुग्णालय उभारावे. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तैनात ठेवावी, पुरेसा औषधसाठा त्याठिकाणी ठेवावा, यासह म्हसवड आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात बेड आरक्षित करून ठेवावेत, अशा सूचना दिल्या.