कराड प्रतिनिधी । कराड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासन सध्या चांगलेच सतर्क झाले आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, विविध विभागांतील अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच दिलेले कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिल्या आहेत.
नुकतेच तयार करण्यात आलेल्या भरारी पथकांमध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन, नामनिर्देशनपत्र दाखल, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व्यवस्थापन, वाहतूक व परिवहन सुरक्षा, प्रशिक्षण व्यवस्थापन, साहित्य व्यवस्थापन सुरक्षा, प्रशिक्षण व्यवस्थापन, साहित्य व्यवस्थापन, आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व निरीक्षण, मतदार जनजागृती व शिक्षण, कायदा व सुव्यवस्था, टपाली मतदान व गृह मतदान, माध्यम, स्ट्रांग रूम व मतमोजणी व्यवस्थापन, संगणकीकरण, सायबर सुरक्षा, भरारी पथके यांचा समावेश आहे.
तसेच दृश्य चित्रीकरण पथके, स्थिर पथके, मतदार यादी व्यवस्थापन, मतमोजणी व्यवस्थापन, विद्युत पुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट जोडणी, मद्य जप्ती, निवडणूक निरीक्षक व्यवस्था आदी विविध समित्यांच्या मध्यवर्ती अधिकाऱ्यांची पथके प्रशासनाकडून तयार केली आहेत.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती
कराड दक्षिण व उत्तर मतदार संघात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. गावोगावी त्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत, तसेच मतदारांना मतदानाचे महत्त्वही पटवून दिले जात आहे.