… तर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन करणार; व्यसनमुक्त युवक संघाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील आळजापूर येथील परमिट रूम बारचा परवाना तात्काळ रद्द करावा अन्यथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानासमोर गांधी जयंतीच्या दिनी, दि. २ ऑक्टोबर रोजी आंदोलन करू, असा इशारा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे वतीने संघटनेचे प्रमुख संयोजक विलास बाबा जवळ यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आळजापूर ता. फलटण जि. सातारा येथे ग्रामपंचायत व ग्रामसभेचा कोणताही ना हरकत दाखला न घेता सौ नंदा कुमार शिंदे रा. कापशी यांना आळजापूर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये परमिट रूम बार चा परवाना दि. ४ जुलै २०२४ रोजी उत्पादन शुल्क विभाग सातारा यांचेकडून देण्यात आला असून या परमिट रूम बार च्या विरोधात आळजापूर येथील ग्रामस्थ व महिला संतापले असून ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम नलवडे यांचेकडे हे दुकान तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थ व महिला यांच्या तीव्र भावना लक्षात घेवून सरपंच शुभम नलवडे यांनी या विषयावर ग्रामसभा बोलावून या सभेपुढे सदर दारू दुकानाचा विषय ठेवला असता ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या सर्वच महिला व पुरुष यांनी हे दारू दुकान बंद करावे या बाजूने हात उंचावून शंभर टक्के पाठिंबा व्यक्त केला. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्थ झाली असून आता गावातच दारू दुकान सुरू झाले तर युवा पिढी उध्वस्त होईल. अशी भीती यावेळी महिलांनी व्यक्त केली. या दारू दुकानामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असून हा दिला गेलेला परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी ही यावेळी ग्रामस्थांनी बहुसंख्येने केली आहे. सदर ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत आपणापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणताही व्यवसाय करीत असताना ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मागितला जातो मग दारू दुकानाला परवानगी देताना उत्पादन शुल्क विभाग परवाना धारकाला ग्रामपंचायतीची परवानगी नसताना परवाना देतेस कसा? स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये नशाबंदी आवश्यक असल्याची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मागणी होती, पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी महसुलाच्या हव्यासापोटी त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन दारू विक्री वाढवण्यासाठी गावागावात व गल्लीबोळात दारूच्या दुकानांची खैरात वाटण्यातच धन्यता समजत आहेत. हे दुर्दैवी आहे.

आळजापूर येथील ग्रामस्थ व महिलांना या गावांमध्ये शांतता हवी आहे. यासाठी या गावांमध्ये दिला गेलेला परमिट रूम बारचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा हा परवाना रद्द केला नाही तर याबाबत गावामध्ये उद्भवलेल्या कोणत्याही परिस्थितीला शासन जबाबदार राहील.

पालमंत्र्यांच्या निवास स्थानासमोर बेमुदत तीव्र आंदोलन करणार : विलास बाबा जवळ

जनभावनेचा अनादर करून उत्पादन खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकाधिकार शाही वापरून जर दारू दुकानदाराला मदत करून ग्रामसभेचा ठराव रद्द केला. तर मात्र व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र ही आमची संघटना गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पासून म्हणजेच २ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री मा. शंभूराजे देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थाना समोर बेमुदत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले असल्याची माहिती व्यसनमुक्त युवक संघाचे प्रमुख संयोजक विलास बाबा जवळ यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘शी बोलताना दिली.