सातारा प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून येत्या काही दिवसात आचार संहिता देखील लागेल. अशात राजकीय पक्षातील नेत्यांच्या पक्षांतराच्या घटना देखील घडत आहेत. यामध्ये आता मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते देखील राजकीय पक्षात दाखल होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आज जाहीरपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहणार आहेत.
सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरुवातीला त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रफुल पटेल, छगन भुजबळ असे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, सयाजी शिंदे यांचा अजितदादा गटात प्रवेश. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाची सुरुवात केवळ राष्ट्रवादीवरच्या फोकसने सुरू झाली. सयाजी शिंदे खडतर परिस्थितून पुढे आले आहेत. त्यांनी सिनेक्षेत्रात अद्वितीय स्थान निर्माण केलं आहे. मराठी मनाला अभिमान वाटावं असं आहे. त्यांनी आपल्याला सीमित ठेवलं नाही. त्यांनी पर्यावरणावर चांगलं काम केलं आहे. ”
सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपट, नाटकात काम केले आहे. तसेच त्यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्येही मोठं काम केले आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी स्वत:हून पुढे येत लाखो झाडे लावली आणि त्यांना मोठे केले. त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचे देखील सर्वत्र कौतुक करण्यात आले. सयाशी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशामुळे पक्षालादेखील फायदा होणार हे नक्की.
सयाजी शिंदेच्या प्रवेशानंतर अजितदादांची Facebook Post
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात एक फेसबुक पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ज्येष्ठ अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. मी श्री. सयाजी शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो. मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षाला अधिक बळकटी येईल तसंच जनकल्याणाच्या कार्यात त्यांचं मोलाचं योगदान लाभेल, असा विश्वास मला आहे. पुढील राजकिय कारकिर्दीसाठी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!”
सातारा जिल्ह्यात ‘हे’ आहे सयाजी शिंदे यांचे गांव
सातारा जिल्ह्यातील वेळेकामठी या लहानशा गावात सयाजी शिंदे यांचा १३ जानेवारी १९५९ रोजी जन्म झाला आहे. अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली. परंतु, घरच्या परिस्थितीनुसार शिक्षण पूर्ण करत असताना सयाजी शिंदे यांनी पाटबंधारे विभागात वॉचमनची नोकरी केली. पुढे, नाटकाची आवड जपण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी मनाशी अभिनेता व्हायचं अशी खूणगाठ बांधली होती. १७ वर्षे बँकेत नोकरी करूनही त्यांचं नाटक लिहिणं आणि त्यात काम करणं या गोष्टी सुरू होत्या. तमिळ, तेलुगू, कन्नड, इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा सहा भाषांमधील नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
सह्याद्री देवराई प्रकल्प उभारणी
महाराष्ट्रात २०१५-१६ काळात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सयाजी शिंदे यांच्या जवळच्या मित्राकडे तब्बल ४०० कोटींची जागा उपलब्ध होती. याच मित्रांच्या साथीने अभिनेत्याने दुष्काळग्रस्त गावात काम करायचे अशा निर्णय घेतला. यातूनच पुढे पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावाच्या बाजूला ‘सह्याद्री देवराई’ हा उपक्रम राबवण्यात आला. सध्या या प्रकल्पाअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी रॉक गार्डन, कॅक्टस गार्डन, ऑर्किड गार्डन उभारण्यात येत आहेत.