सातारा प्रतिनिधी | राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी नांदेड येथे गेलेले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व सिने कलावंत संतोष नलावडे (वय 45) यांच्या दुचाकीला नांदेडमध्ये अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातार्यात नुकत्याच झालेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत संतोष नलवडे यांनी यश मिळवले होते. त्यांची राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामुळे ते नांदेडला गेले होते. नांदेड शहरात दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात संतोष नलावडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांना सोमवारी पहाटे सातार्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, त्यांचे उपचारांदरम्यान निधन झाले.
त्यांच्या निधनाने महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी हळहळले. संतोष नलावडे यांनी सरकारी नोकरी सांभाळत अनेक हिंदी व मराठी नाटक, चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. संतोष नलावडे यांच्या पश्चात आई, पत्नी, अविवाहित मुले असा परिवार आहे.