सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा निकाल दि. 4 जून रोजी लागणार आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यभरात अनेक ठिकाणी हौशी कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांच्या विजयाचे बॅनर लावून विजयाचा दावा केला जात आहे. काही दिवसापूर्वी शशिकांत शिंदे यांच्या खंडाळ्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचे बॅनर लावले होते. त्यांच्या नंतर आता महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या विजयाचे बॅनर पिंपरी चिंचवडमधील खंडोबा माळ परिसरात लावले आहेत. त्यांच्या या बॅनरची चांगलीच चर्चा सुरू आहे.
सातारा लोकसभेसाठी महायुतीतून उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीतून शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली आहे. सातारा लोकसभेसाठी 60 टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूने विजयाचा दावा करण्यात येत असला तरी निकाल हा दि. 4 जून रोजी लागणार असून या दिवशी गुलाल कुणाचा उडणार? हे स्पष्ट होणार आहे.
खा. उदयनराजे भोसले यांनी सुद्धा आपल्या विजयाचा दावा केला आहे. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उदयनराजे भोसले यांच्या विजयाचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांनी सुद्धा विजयाचा दावा केला आहे.
दोन्ही नेत्यांच्या बॅनरमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार..
सातारा लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यातील उमेदवारांनी प्रचारात चांगलाच धुरळा उडवून दिला. महायुतीचे उमेदवार उदयनराजेंनी तर आपणच जिंकणार असे सांगत जिल्ह्यातील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खात्री पटवून दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उमेदवार शशिकांत शिंदे यांनी देखील गावागावात लोकांच्या गाठीभेटी घेत शेतकरी, काबाडकष्ट करणाऱ्यांसोबत संवाद साधला. आता निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यातील निवडणुकीचे वातावरण शांत झाले होते. मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मध्यंतरी शशिकांत शिंदेंच्या विजयाच्या दाव्याचे खंडाळ्यात बॅनर लावण्यात आले. त्यांच्या नंतर आता खा. उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे पिंपरी चिंचवड येथे बॅनर झळकले आहेत. या बॅनर बाजीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार हे नक्की!