सातारा प्रतिनिधी । बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अतिरेकी वसुली प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज बजाज कंपनीचे कार्यालय फोडलं. या माध्यमातून ठाकरे गटाने शिवसेना स्टाईल दाखवली.
अतिरिक्त व वसुलीच्या तगाद्यामुळे एका मागासवर्गीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या महिलेचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. बजाज फायनान्सकडून होणाऱ्या अतिरिक्त त्रासामुळे कोणताही विचार न करता घरात घुसून लोकांना त्रास देणे, पैसा वसुलीसाठी मुजोरपणा दाखवणे, अशा प्रकारांना त्रासून काही जणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गाऱ्हाणी मांडली. त्याची दखल घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी आज बजाज कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच शिवसेना स्टाईलने कार्यालयाची तोडफोड केली.
कर्मचाऱ्यांनाही आपले वर्तन सुधारावे, असा इशारा ठाकरे गटाने बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिला. या घटनेनंतर सातारा शहर पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तोडफोड करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडल्याने अन्य फायनान्स कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.