‘हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच’; साताऱ्याच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा अजितदादांसमोर आग्रह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा उमेदवारीवारीवरील दावा सोडायला अजितदादा गट तयार नाही. ‘हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच असून साताऱ्याचा उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा ‘, अशी भूमिका मांडत साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी अजितदादांसमोर उमेदवारीचा आग्रह धरला.

उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा उमेदवारीच्या संदर्भात मते जाणून घेण्यासाठी बुधवारी (दि. २७) पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीला वाईचे आमदार मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. साताऱ्याचा उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी देखील तीच मागणी लावून धरली.

लोक विचारपूर्वक निर्णय घेतात

विधानसभा निवडणुकीत लोक स्थानिक सोयीनुसार निर्णय घेत असतील. परंतु, लोकभेला लोक विचारपूर्वक निर्णय घेतात, हे मागील निवडणुकीत दिसून आलंय. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यात केवळ दोन आमदार असतानाही लोकसभेचा उमेदवार निवडून आला. जिल्ह्याचा राजकीय आढावा घेताना लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या पुर्वीची स्थिती आणि नंतरची परिस्थिती ध्यानात घेण्यासारखी असल्याचे कराड तालुक्यातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने अजितदादांसमोर उदाहरणासह स्पष्ट केलं.

हट्ट उदयनराजेंचा, पण हक्क अजितदादांचाच..

पुण्यातील बैठकीत अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारीसाठी आक्रमक झालेल्या उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून संयमाने भूमिका मांडली. उमेदवारीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा हट्ट असला तरी उमेदवारीवर दादा तुमचाच हक्क आहे. त्यामुळे उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा, असा आग्रह उपस्थित कार्यकर्त्यांनी धरला.