सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुकास्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात याव्यात अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या होत्या याअनुषंगाने सातारा तालुक्याची नियोजन बैठक पंचायत समिती येथे घेण्यात आली.
महाराष्ट्र शासनाचा ‘स्वच्छ भारत अभियान’ सातारा तालुक्यात सर्व ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येत आहे सातारा तालुक्यात प्रत्येक गावात स्वच्छतेचे सातत्य राखणेसाठी उपक्रम राबविले जातात.गावातील रस्ते, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय मार्गावर कचरा व प्लास्टिक टाकणाऱ्या लोकांवर व प्लास्टिक साठवणूक विक्री करणारे विक्रेते व वापर करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाही केली जाणार आहे अशी माहिती गटविकास अधिकारी बुद्धे यांनी दिली.
या मोहिमेसाठी प्रत्येक गावात एका पथकाची नेमणूक केली असून यामध्ये प्रत्येक गावात गावचे सरपंच, ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ता ग्रा.प. सदस्य, पोलीस पाटील असे पथक असेल तालुकास्तरावर एकूण ५ पथके तयार केली असून या पथकामध्ये गटविकास अधिकारी, सहा गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत असे सदस्य असतील.या भरारी पथकाची मोहीम बुधवार दि.१४ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. ही पथके प्लास्टिक विक्री साठवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना पहिला गुन्हा ५ हजार, दुसरा गुन्हा १० हजार व तिसरा गुन्हा केल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारणार आहेत तसेच उघड्यावर कचरा प्लास्टिक टाकणाऱ्या व्यक्तींना १२०० रुपयांपासून पुढे दंड आकारणार आहे.
या मोहिमेस कोणी अडथळा केला तर त्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे.गावे स्वच्छ राखण्यासाठी व प्लास्टिक बंदीसाठी गावात दवंडी, नोटीस बोर्ड, फ्लेक्स व गावातील सोशल मीडिया ग्रुपवर प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार आहे.गावात स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत. यामध्ये तालुका भरारी पथकात स्थानिक पोलिसांचा सहभाग असणार आहे.
त्या व्यक्तींच्याकडून दंड वसूल करावा पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावरील भरारी पथके ग्रामपंचायती, बाजाराची गावे, पर्यटन स्थळे येथे अचानक भेटी देणार आहेत प्रत्येक गावातील रस्ते, चौक, गाव परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीम स्वरूपात उपक्रम हाती घेण्यात आला आहे.