सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा रुग्णालयांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्यावतीने (एनटीपीसी) ‘कोटपा’ कायद्यानुसार कारवी केली जात आहे. या कारवाई अंतर्गत नुकतीच वडूज येथील १४ टपऱ्यांवर धडक मोहीम राबवित ७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई व व्यापार वाणिज्य उत्पादन आणि नियमन) कायदा २००३ अर्थात ‘कोटपा’ कायद्याच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांची जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे.
या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, तंबाखूची जाहिरात आदी निर्बंध आहेत. त्याअनुषंगाने तंबाखू विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि एनटीपीसीच्या जिल्हा सल्लागार डॉ. दिव्या परदेशी, मानसशास्त्रज्ञ दिपाली जगताप यांनी सहभाग घेतला.