सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर येथे विनापरवाना कोळसा भरून निघालेल्या ट्रकवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचा कोळसा व ७ लाख ८५ हजार रुपयांचा ट्रक असा सर्व मिळून ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाहन मालक संतोष तुकाराम देशमुख (रा. देशमुखकांबळे, ता. महाड, जि. रायगड) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सातारा – महाबळेश्वर रस्त्यावर माखरिया गार्डनशेजारी नवनविभागाचे पथक रात्रगस्त घालत होते. त्याचवेळी महाडकडून महाबळेश्वरच्या दिशेने येणारा ट्रक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी थांबवला. त्याची तपासणी करत असताना त्यामध्ये १६८ पोती कोळसा भरल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, ५ ट्रकमधील कोळसा वाहतुकीच्या परवान्याबाबत ट्रकचालकाकडे चौकशी केली असता, परवाना त नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर वनविभागाने हा ट्रक ताब्यात घेऊन तो विश्रामगृहात आणण्यात आला. उपनवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनरक्षक अभिनंदन सावंत, लहू राऊत, रमेश गडदे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास वनपाल सहदेव भिसे करत आहेत.