सातारा प्रतिनिधी । गळीत हंगाम २०२१ मधील शेतकऱ्यांची एफआरपीनुसार असणारी देणी थकवल्याप्रकरणी किसन वीर व खंडाळा साखर कारखान्यास साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. ही नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली असून, त्यामध्ये कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची थकीत देणी भागविण्यात यावीत, असे म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाईबाबत उत्सुकता लागली आहे.
राज्यातील १८८ साखर कारखान्यांनी गळीत केले. त्यापैकी ८७ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, तर १०१ कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीनुसार होणारी रक्कम थकविलेली आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यांवर एफआरपी कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यानुसार साखर आयुक्तांनी राज्यातील १९ साखर कारखान्यांना आरआरसीची नोटीस बजावली आहे. यामध्ये भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर खंडाळा साखर कारखान्याचा समावेश आहे. ही नोटीस जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालमत्ता विक्रीतून देणी
किसन वीरने मार्च २०२१ रोजी पर्यंतची ४ कोटी ९० लाख ४५ हजारांची एफआरपी थकविली आहे. खंडाळा कारखान्याकडे ७६ कोटी १८ लाख ७० हजारांची थकबाकी आहे. ही थकीत रक्कम कारखान्यांच्या मालमत्तेची विक्री करून त्यातून येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांची थकीत देणी भागवावी, असे नोटिसीत म्हटले आहे.