कराड प्रतिनिधी | मेरवेवाडी येथे तलाव, धबधबा परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तब्बल ३५ युवक, युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या निर्भया पथकाने दुपारनंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. युवतींचे समुपदेशन करून त्यांना सोडून देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेरवेवाडी तलाव परिसर निसर्गरम्य आहे. तेथे पर्यटक भेट देतात. काही युवक-युवती दुचाकीवरून मंगळवारी येथे आले होते. त्यांच्याकडून हुल्लडबाजी केली जात होती. त्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी निर्भया पथकाला संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार निर्भया पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्यासह दीपा पाटील, मयूर देशमुख व अमोल फल्ले यांचे पथक कर्मचाऱ्यांसह मेरवेवाडीत दाखल झाले. त्यावेळी तलावाच्या पाण्यात तसेच धबधब्याखाली युवक-युवती हुल्लडबाजी करताना दिसून आले. पोलिसांनी तेथून ३५ जणांना ताब्यात घेतले. संबंधित युवक-युवती दुचाकींवरून त्याठिकाणी आले होते. हा परिसर निर्जन असल्यामुळे त्यांच्याकडून आरडाओरडा करत तलावाच्या पाण्यात हुल्लडबाजी सुरू होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन निर्भया पथकाच्या कक्षात आणले. त्याठिकाणी युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. दीपा पाटील यांच्यासह इतर महिला पोलिसांनी युवतींचे समुपदेशन केले.