सातारा प्रतिनिधी । सातारा शहर व परिसरात तसेच महामार्गावर धोकादायक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांच्यावतीने गत आठवड्यात कारवाईची धडक मोहीम राबविली. आठ दिवसांत पोलिसांनी तब्बल १३९ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख २० हजारांचा दंड वसूल केला. तर चार वाहन चालकांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत.
सातारा शहर परिसरातील शिवराज पेट्रोलपंप, लिंबखिंड, जोशी विहीर, शिरवळ आदी ठिकाणी प्रवासी ही महामार्गावर पोलिसांनी हि तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. कारवाईत एखादे अवजड वाहन सापडल्यास संबंधित वाहन चालकाला जागच्या जागी दंड करून वाहन चालविण्याचा परवाना निलंबित केला जाणार आहे.
महामार्गावरून धोकादायक प्रवास सुरू असल्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. ट्रक चालक लेनकटिंग करून भलत्याच लेनमधून प्रवास करतात. तर वडाप जीप खचाखच भरून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. त्याचबरोबर काही वाहन चालक वाहनामध्ये लांब लोखंडी सळ्या भरून धोकादायक प्रवास करत. यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना सेच या सळ्यांचा धोका संभवू शकतो. हे प्रकार अलीकडे निर्धास्तपणे सुरू असून, वाहन चालकांचा बेफिकीरपणा दिसून येत आहे.
वाहन चालकांचे धाबे दणाणले
भविष्यात एखाद्याचा जीव जाऊ नये म्हणून जिल्हा वाहतूक शाखा तसेच सातारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. महामार्गावर पेट्रोलिंग वाढविण्यात आले असून वाहन चालकांचा बेशिस्तपणा निदर्शनास आल्यास तातडीने जागच्या जागी दंड करून परवानाही निलंबित केला जात आहे. ही कारवाई सुरू झाल्याने वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.
१ लाख २० हजारांचा दंड वसूल
कराडपासून शिरवळपर्यंत आणि ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ही करत कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांनी रात्री १३९ वाहन चालकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ लाख २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर चार वाहन चालकांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत.
रात्रीच्या सर्वाधिक कारवाया
पुणे – बंगळूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास धोकादायक प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे पोलिस तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी अशा वाहनांवर लक्ष ठेवून आहेत. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
कारमधूनही प्रवासी वाहतूक
महामार्गावरून मोठ्या वाहनांप्रमाणे छोट्या कारमधून देखील प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले आहे. काही कार चालक पुण्याहून कामासाठी ये-जा करतात. मात्र, एकटा प्रवास करण्यापेक्षा कारमध्ये पाच ते सहा प्रवासी बसविले जातात. मात्र, या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी महामार्गावर एका कारचा अपघात झाला. त्या कारमध्ये बसलेल्या प्रवाशाचा अपघातात पाय फॅक्चर झाला. त्याला भरपाई कोणाकडून मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याचे कारण अपघात झाल्यानंतर कार चालक जखमीला रुग्णालयात सोडून तेथून निघून गेला.