कराड प्रतिनिधी । कराड शहरासह लगतच्या महामार्गासह सर्वच मार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. यावेळी सात जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून चार हजारांचा दंडही वसूल करण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कामाचा आढावा घेण्याची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली होती. या बैठकीत त्यांनी शहरालगतच्या महामार्गासह सर्व मार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानंतर पालिकेकडून धडक कारवाईची मोहीम रावबिण्यात आली.
पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील पालिकांनी शहरालगतच्या भागात नदीवरील पुलांवर स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार येथील पालिकेने शहरातील तिन्ही पुलांवर स्वच्छता मोहीम राबवली. वारुंजीच्या हद्दीतील मंत्री पाटण तिकाटणे भागात उघड्यावर कचरा न टाकणारे फळ विक्रेते, दुकानदारांवर पालिकेने कारवाई केली. त्यावेळी वारुंजी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पालिकेसमवेत होते. त्यांची संयुक्तिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या फळविक्रेते, दुकानदार सात जणांवर दंडात्मक कारवाई झाली. त्यांच्याकडून सुमारे चार हजारांचा दंड वसूल केला.
१५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त
कराड शहरात मंगळवारी कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई केल्यानंतर प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम देखील राबवली. त्यात बंदी असलेल्या १५ किलो पिशव्या जत करण्यात आल्या. यामध्ये प्लॅस्टिक साहित्य व ५० मायक्रोन प्लस्टिक पिशव्यांचा समावेश आहे. मोहिमेत नगरपालिकेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.