फलटणमधील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा; नगरपालिकेच्या 35 कर्मचाऱ्यांचा कारवाईत सहभाग

0
3

सातारा प्रतिनिधी । फलटण नगरपरिषदेच्यावतीने पोलिस बंदोबस्तात शहरातील अतिक्रमणांवर प्रशासनाने नुकताच हातोडा उगारला आहे. शहरात अनेक ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे दोन जेसीबीच्या सहाय्याने काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही मोहीम सलग चार दिवस राबवली जाणार आहे. नगरपालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांसह 35 कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत.

शहरात असणार्‍या अतिक्रमण धारकांना अनेक वेळा सांगूनही अतिक्रमणे काढली जात नसल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दोन जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. फलटण नगरपरिषद हद्दीतील आरक्षित जागा, पडीक जागा, गायरान जमिनी, शासकीय जमिनी, नगरपरिषद मालकीच्या जागेवर, रस्त्यावरील अतिक्रमणे ही फलटण नगरपालिकेच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहेत. अलीकडच्या काळात वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाल्याने तसेच नागरिकांच्या तक्रारीही वाढल्याने पोलिस बंदोबस्त घेऊन नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.

अनेकांनी हटवली स्वतःहून अतिक्रमणे

या मोहिमेत रस्त्यावरील व वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे, जाहिरात फलक, पत्रा शेड, दुकान बोर्ड, गाडे, टपर्‍या हटवण्यात आल्या. अतिक्रमणे नगरपालिकेकडून काढली जात असल्याचे लक्षात येताच अनेकांनी फलक, बोर्ड, गाडे, स्वतः हटवून नगरपालिकेस सहकार्य केले.

अतिक्रमण हटाव मोहिमेचे सर्वसामान्यातून स्वागत

शहरातील सर्व भागात वाहतुकीस अडथळे असणारी सर्व अतिक्रमणे काढण्यात येईपर्यंत सुरू ही मोहीम राहणार आहे. ज्या-ज्या नागरिकांची अतिक्रमणे आहेत. त्यांनी त्यांची अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास आंबेडकर पुतळा-स्तंभ चौक- डीएड चौक- अहिल्यादेवी होळकर चौक ते नाना पाटील चौक या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. दुपारनंतर आंबेडकर चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक या परिसरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू होती. या अतिक्रमण हटाव मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.