सातारा प्रतिनिधी । वाई येथील न्यायालय परिसरात कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल व अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी राजेश चंद्रकांत नवघणे ( वय २६, रा. मेणवली) याला अटक केली होती. यानंतर त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेणवली (ता वाई) येथील हॉटेल व्यवसायिकाला दहा लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्या प्रकरणी पोलिसांनी कळंबा कारागृहातून तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले होते. या आरोपीना वाई न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता त्यांच्यावर राजेश नवघरे याने गोळीबार केला. नवघणे याच्याबरोबर आणखी काही लोकांना ताब्यात घेतले असून त्याने गोळीबारात वापरलेले पिस्टल कोणाकडून घेतली? याबाबत त्याची कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी वाई पोलीस ठाण्यास भेट देऊन तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, कृष्णकांत पवार हे तपास शकामी वाईमध्ये तळ ठोकून आहेत. या घटनेचा अधिक तपास परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करत आहेत.