कराड प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील एका युवकाने मोराच्या अंगावरची पिसे उपसून त्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. संबंधित आरोपी पाटण तालुक्यात आला होता. त्या फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून एक युवतीसह आरोपीस पाटण तालुक्यातील बेलवडे खुर्द या गावाजवळ अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेश येथील रिठी वनपरिक्षेत्रात राहणाऱ्या अतुल (पूर्ण नाव नाही) याने एका युवतीसोबत वनक्षेत्रात एक मोर पकडला होता. या मोराची नंतरच्या काळात त्याने पिसे उपसून काढत त्याचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याठिकाणच्या वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. वनकर्मचारी शोध घेत असल्याचे समजल्यानंतर अतुल हा युवतीसोबत त्याठिकाणाहून पसार झाला होता. पसार असणारा अतुल सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असल्याची माहिती रिठी वनविभागास मिळाली होती. यानुसार त्यांनी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी, तसेच सहायक उपवनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी पाटणचे वनक्षेत्रपाल, कर्मचारी, फिरत्या पथकास माहिती देत संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. यानुसार पाटण तालुक्यातील बेलवडे खुर्द गावाजवळून या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याची माहिती मध्य प्रदेश वनविभागास देण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांना पाटण न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.