सातारा प्रतिनिधी | दोन वर्ष तडीपार केले असताना कराडमध्ये प्रवेश करून कोल्हापूर नाका परिसरात छुप्या पद्धतीने वावरताना आढळलेल्या संशयिताला कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. आबीद आलम मुजावर (रा. पालकर वाडा, मंगळवार पेठ, कराड), असे त्याचे नाव आहे.
दोन वर्षांसाठी केलं आहे तडीपार
आबीद मुजावर हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याला व त्याच्या साथीदाराला कराड शहर पोलीसांनी सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. असे असताना आबीद मुजावर हा कोल्हापुर नाका येथे छुप्या स्वरुपात वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक पतंग पाटील यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह कोल्हापुर नाक्यावर सापळा रचून तडीपार आरोपी आबीद मुजावर यास ताब्यात घेतले.
कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, पोलीस नाईक कुलदीप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.