सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुधावलेवाडी येथे २४ एप्रिल २०२० रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना घडली होती. या खून प्रकरणात वडूजच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नुकतीच आरोपी बाळू गजानन बुधावले यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
खटाव तालुक्यातील बुधावलेवाडी येथे करण्यात आलेला खून पूर्ववैमनस्यातून झाला होता, ज्यामध्ये आरोपींनी दगडाने ठेचून तरुणाचा जीव घेतला होता. या प्रकरणात पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी हिम्मत देवबा बुधावले याच्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला चढवला होता.
त्यांनी हिम्मत यास तलावातून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि दगडाने ठेचून त्याचा जीव घेतला. या प्रकरणात साक्षीदार प्रकाश मदने यासह अनेक साक्षीदारांची जबाबी दिली गेली आणि वैद्यकीय पुरावे जमा करण्यात आले. सरकारी वकील अजित कदम (साबळे) यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहिले.