सातारा प्रतिनिधी | सातारा- मेढा रस्त्यावर हामदाबाज येथे भरधाव कारने दुचाकीला धडक
दिल्यानंतर झालेल्या अपघातात सैन्य दलातील जवान विशाल दत्तात्रय केंजळे (वय ३२, रा. मु. केंजळ पो. मोरावळे, ता. जावली) यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचा भाचा व भाची जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दि. २८ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. चालकाने कार भरधाव चालवल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, विशाल केंजळे हे कोंडवे ते केंजळे असे दुचाकीवरून निघाले होते. सोबत भाचा अथर्व (वय १०) व भाची प्राजक्ता (१७) हे होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हामबाबाज येथील आनंदग्रीह सोसायटी परिसरात मुख्य रस्त्यावर आल्यानंतर एमएच ११ सीटी ४३०८ या कारची धडक बसली. यात विशाल केंजळे यांना गंभीर दुखापत झाली तर त्यांचा भाचा व भाची यांना किरकोळ दुखापत झाली. नागरिकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी सिव्हीलमध्ये हलवले. विशाल यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवले.
शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना समजताच त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. विशाल केंजळे यांच्या पश्चात पत्नी, २ वर्षाची मुलगी, आई-वडील, बहिणी असा परिवार आहे. जवानाच्या अपघाती मृत्यूनंतर गावामध्ये शोककळा प्रसरली आहे. दरम्यान, अपघात प्रकरणी कारचालक संतोष सुरेश होगाडे (वय ३२, रा. मोरेश्वर पो.माचुतर ता. महाबळेश्वर) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.