सुट्टीवर आलेल्या कार्वे गावचे जवान अमोल थोरात यांचा अपघाती मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र व भारत तिब्बत सिमा पोलीस दलातील जवान अमोल प्रल्हाद थोरात (वय ३२) या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कार्वे गावावर शोककळा पसरली आहे. जवान अमोल थोरात यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कार्वे गावचे जवान अमोल प्रल्हाद थोरात (वय ३२) हे एका महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. अमोल थोरात हे १३ वर्षांपूर्वी भरती झाले होते. ते काल मंगळवारी सुट्टी संपवून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कामावर हजर राहण्यासाठी रात्री दहा वाजता जाणार होते. काल अमोल थोरात हे दुचाकीवरून गावातून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रानात जात असताना कृष्णा पोट कालव्याजवळ मुसळधार पावसात वीज कडाडली.

त्यावेळी त्यांचा गाडीवरून ताबा सुटला. गाडीसह ते उसाच्या शेतात जाऊन पडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल सायंकाळी शेत शिवारात निघालेल्या काही शेतकऱ्यांनी अमोलला शेतात पडल्याचे पाहिले. त्यांनी त्यांना तत्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अमोल यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर कार्वे गावावर शोककळा पसरली आहे.

aa3c448d c3e7 4f15 b9b0 276a94ffbbaf

अमोल यांच्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती अमोल यांच्या काम करत असलेल्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना दिली आहे. अधिकारी आज कार्वे गावात अमोल यांच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले आहेत. अमोल यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी, बहीण असा परिवार आहे.