कराड – शामगाव मार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड ते शामगाव मार्गावर करवडी, (ता. कराड) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. बाजीराव किसन पवार (वय ६५) रा. पवारवाडी-बोपोली, ता. जि. सातारा यांचा असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील करवडी येथील शुभम पिसाळ हे गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शामगाव रोडवरुन आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यावर दुचाकी पडल्याचे तसेच नजीकच एका पुरुषाचा मृतदेह पडल्याचे त्यांनी पहिले. शुभम यांनी आपली गाडी रस्त्याकडेला उभी करून अपघात घडलेल्या ठिकाणी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना संबंधित व्यक्तीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याचे दिसले.

शुभम यांनी अपघात झालेल्या व्यक्तीच्या खिशातील कागदपत्र तपासली असता आधारकार्डवरुन त्याची ओळख पटली. त्यानंतर शुभम यांनी संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवरुन त्याच्या घरी फोन करुन अपघाताची माहिती दिली. तसेच कराड तालुका पोलीस ठाण्यातही याबाबतची माहिती दिली.अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. आणि तो मृतदेह त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याबाबत शुभम बाळासाहेब पिसाळ (रा. करवडी) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.