कराड प्रतिनिधी । पुणे-बंगलोर महामार्गावर कराडपासून काही अंतरावर असलेल्या वहागाव गावच्या हद्दीत रक्षाबंधन करून परतत असणाऱ्या दुचाकीचा रस्त्यावरील डिव्हाईडरला धडकल्याने अपघात झाला आहे. महामार्गावर ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने सिमेंटचे डिव्हाईडर ठेवल्याने दुचाकी धडकली. यामध्ये एक ५ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून एक स्त्री व एक पुरुष हे किरकोळ जखमी झाले आहेत. ते तालुक्यातील देवकरवाडी येथील असल्याचे समजते.
आज रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसत आहेत. आज दुपारी रक्षाबंधन करून परतत असताना एका दुचाकीला महामार्गावर अपघात झाला. वहागाव गावच्या हद्दीत सिमेंटच्या डिव्हायडरला दुचाकी धडकल्याने गाडीवरील तिघेजण रस्त्यावर पडले. यामध्ये पाच वर्षांची चिमुकली जखमी झाली, तर महिला आणि पुरूषाला किरकोळ दुखापत झाली.
दरम्यान, या अपघातावेळी NDRF चे जवान कोल्हापूरहून पुण्याला निघाले होते. अपघाताची घटना पाहून ते थांबले. चिमुकलीच्या डोक्याला आणि हनुवटीला दुखापत होऊन रक्तस्राव होत होता. एनडीआरएफ जवानांनी जखमी चिमुकलीवर प्रथमोपचार करून तिन्ही जखमींना पुढील उपचारासाठी रूग्णालयात पाठवले.