सातारा प्रतिनिधी । आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात आता गाड्यांची वर्दळ देखील बरीच वाढली आहे. मात्र, या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. दरम्यान, आज शनिवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सहल घेऊन आलेल्या एसटी बसला घाटात अपघात झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टाळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेली एसटी बस (MH 40 AQ 6225) प्रतापगडाहून महाबळेश्वरकडे निघाली होती. बसमधून ६० विद्यार्थी प्रवास करत होते. वाडा कुंभारोशी गावापासून २ किलोमीटर अंतरावर बस येताच एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याकडेला कलली. एसटीची चाके मातीच्या ढिगार्यात रुतून बसल्याने बस पलटी होता होता वाचली.
सर्व विद्यार्थ्यांना तातडीने आपत्कालीन दरवाजातून बाहेर सुरक्षित काढण्यात आले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अचानक झालेल्या या अपघातामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र, भीती पसरली होती. काही वेळात चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्यावर सुरक्षित काढली. यानंतर विद्यार्थ्यांसह बस महाबळेश्वरकडे मार्गस्थ झाली. या अपघातामुळे घाटात काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.