सातारा प्रतिनिधी | भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्यासाठी ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षकाकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना सातारा जिल्हा परिषदेतील वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या वरिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हेमंत विठोबा हांगे, असे लाचखोर वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे.
भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी पडताळणी केली. त्यामध्ये लोकसेवकाने लाच मागितल्याचे आढळून आले.
सापळा रचून कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लोकसेवकाने लाचेची मागणी केल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हा परिषद इमारतीमधील वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात सापळा रचून अधिकाऱ्यांनी वरिष्ठ सहाय्यकास ३ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक गणेश ताटे, पोलीस शिपाई तुषार भोसले, नीलेश येवले यांनी ही कारवाई केली.
लाच मागितल्यास संपर्क साधावा
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उप अधीक्षक राजेश वाघमारे यांनी केले आहे.