सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना नुकतीच घडली असून १ लाख रुपयाची लाच घेताना सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव असे संबंधित लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात सहकार्य करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक उज्जवल वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारावर परमिट रूममधून दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मदत आणि यापुढे कोणताही त्रास न देण्यासाठी औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे याने दीड लाखांची लाच मागितली होती. १ एक लाख रुपयांवर तडजोड झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडेच्या वतीने शुक्रवारी लाचेची रक्कम घेताना सहाय्यक फौजदार बापूसाहेब नारायण जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरची कारवाई एसीबीच्या पथकाने औंध येथील जुना एस टी स्टँड, बाजार पटांगण परिसरात लाच स्वीकारताना सापळा रचून कारवाई केली. रात्री उशिरा औंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्जला वैद्य, पोलीस नाईक नीलेश चव्हाण, पोलीस शिपाई तुषार भोसले, निलेश येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.