कराड प्रतिनिधी । तक्रारदाराने जमिनीतून स्वखर्चाने गाळ, मुरूम, माती काढून वाहतूक करण्याकरिता भाड्याने वापरलेली वाहने जप्त करू नयेत म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या पिंपोडे बु. ता. कोरेगाव येथील मांडलाधिकाऱ्यावर आज लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला. संबंधिताने सुरुवातीला 50 हजारांची लाचेची मागणी केली होती. नंतर 40 हजार रूपयांवर तडजोड केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती उज्वल अरूण वैद्य यांनी दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे मौजे मोरबंदवाडी गावचे गट नंबर 28 मधील जमिनीतून स्वखर्चाने गाळ मुरूम, माती काढून वाहतूक करण्याकरता भाड्याने जेसीबी व ट्रॅक्टर वापरला होता. ती वाहने जप्त न करण्यासाठी तसेच गौण खनिज कायद्याअंतर्गत कारवाई न करण्याकरिता लोकसेवक संजय रावसाहेब बोबडे (वय 58, पिंपोडे बु// ता. कोरेगाव) यांनी तडजोडीअंती 40 रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी मांडलाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या फिर्यादीनंतर सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्ज्वल अरुण वैद्य, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस अंमलदार पोहवा नितीन गोगावले, पोना निलेश राजपुरे, पो. कॉ. विक्रमसिंह कणसे यांनी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डाॅ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्ग दर्शनाखाली केली.
यावेळी सर्व नागरीकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. याबाबत कार्यालयीन क्रमांक 02162-238139 येतेच किंवा सातारा कार्यालय मेल आयडी [email protected] यावर आपण आपली तक्रार नोंदवू शकता. तसेच टोल फ्रि क्रं. 1064 वर सुद्धा तुम्ही तक्रार दाखल करू शकता.