सातारा प्रतिनिधी । वडिलोपार्जित जमिनीचे वाटपाची सातबारा नोंद करण्यासाठी 13 हजार रूपयांची लाच घेताना तलाठी आणि मंडल अधिकारी यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सातारचे पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राजेश वाघमारे यांनी दिली आहे.
यामध्ये लोकसेवक जितेंद्र बाळासाहेब कोंडके (वय- 53 वर्षे, नोकरी- मंडळ अधिकारी, फलटण भाग,फलटण जि.सातारा वर्ग-3, रा. पुजारी कॉलनी, फलटण ता. फलटण), श्रीमती रोमा यशवंत कदम (वय-31 वर्ष, पद-तलाठी सजा फलटण, वर्ग-3, रा. मलठण ता. फलटण जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे वडिलोपार्जित जमीनीचे वाटणीपत्र झाले असुन त्याप्रमाणे सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी लोकसेवक तलाठी कदम यांनी स्वतःसाठी 3 हजार रुपये व लोकसेवक सर्कल कोंडके यांचेसाठी 10 हजार रुपये अशी एकुण 13 हजार रुपयांची लाच मागणी केली. लोकसेवक कोंडके व तलाठी कदम यांचे कार्यालय फलटण चावडी येथील एकाच इमारतीत असुन लोकसेवक मंडलाधिकारी जितेंद्र कोंडके यांनी सदर लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम स्वतःत्यांचे सर्कल कार्यालय फलटण येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
दोन्ही लोकसेवकांना घेतले पथकाने ताब्यात
कारवाईनंतर दोन्ही लोकसेवकांना ला.प्र.वि. पथकाने ताब्यात घेतले. हि कारवाई ला.प्र.वि.पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे,अपर पोलिस अधीक्षक विजय चाैधरी, सातारचे पोलीस उपअधिक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस अंमलदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश येवले, शितल सपकाळ यांनी कारवाई केली आहे.