सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. दरम्यान, नव्या संसदेला काय नाव द्यायच? यावरुन देशभरात चर्चा सुरु असताना साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा यांनी डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यावरून बीचुकले यांना साताऱ्यातील RPI कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घातला.
नव्या संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली होती. यामुळे साताऱ्यातील आरपीआय गटाने त्यांचा दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला. भारत देशाच्या सर्वोच्च सभागृहाला बाबासाहेबांचे नाव देणारा नेता, अभिनेता हा सातारा जिल्ह्यातील सुपुत्र आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आंबेडकरांच्या नावासाठी मी उरुन पुरुणार : बिचुकले
या दुग्धाभिषेकानंतर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशात नवी संसद उभारण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव नव्या संसदेला द्यावे, असे पत्र मी पंतप्रधान मोदींना लिहिले. अशी मागणी करणारा मी पहिला भारतीय आहे. यामुळे माझ्या नकळत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने माझा दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला. दुग्धा भिषेकाला स्मरुन मी सांगतो, माझा लढा सुरु झाला आहे. नवीन संसद भवनाला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, यासाठी मी उरुन पुरुणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.