सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बिगबॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) हे उतरले असून ते येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी उदयनराजेंसह नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “आपली उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही, असा टोला बिचकुलेंनी यावेळी सर्वाना लगावला.
अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यात नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मी देखील माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या, ही मागणी मी केली होती. समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत पाठपुरावा देखील करणार आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. पण, स्मारकाची एक विटही रचली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठिशी मतदारांनी उभे राहा, असे आवाहन बिचुकलेंनी केले.
शरद पवार आणि उदयनराजे यांचे हाडवैर आहे. अभयसिंह महाराज यांचेही खच्चीकरण शरद पवार यांनी केले. योग्य वेळ आली की त्यांच्यावर बोलणार आहे. मी या लढाईत एकटा लढत असून लोकांनी पाठिशी उभे राहावे, असे आवाहन बिचुकले यांनी केले.
कोण आहेत अभिजित बिचुकले? (Abhijit Bichukle)
अभिजित बिचुकले हे मूळचे सातार्याचे रहिवासी आहेत. ते बिगबॉस मध्ये देखील जाऊन आले आहेत. त्यांनी 2004 पासून उदयनराजेंच्या विरोधात 4 निवडणूका लढवल्या आहेत. यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. परंतू 2009 मध्ये त्यांना 12 हजारांहून जास्त मतदान केलं होतं. अभिजीत बिचुकलेंनी गल्ली ते दिल्ली पर्यंत त्यांनी अनेक निवडणूकांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. आता ते पुन्हा लोकसभेत उदयनराजेंच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. 2014 च्या विधानसभेतही त्यांनी वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज केला होता. मात्र या निवडणूकीतही त्यांचं डिपॉजिट जप्त झाले होते. कसबा पोट निवडणूकीतही भाजपच्या हेमंत रासने, कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांसमोर त्यांनी निवडणूक लढवली होती.