सातारा प्रतिनिधी | बेधडक वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जोरदार फटकेबाजी केली. आज मतदारच विकले जात नाहीत, तर त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधीसुध्दा विकले जातायत, हे आपण २०१९ पासून बघतोय. आजकाल या नेत्यांची भाषा पाहा. अजितदादाच परवा जन्मदरावर बोलताना मुली पुढे द्रौपदी होतील, असं म्हणाले. अजित पवारांमध्ये दुर्योधन लपलाय का, अजित पवारांमध्ये दुर्योधन असेल तर सुनेत्रा वहिनी पहिले अजितदादांचे तुम्ही कान पिळा. नाही तर मी कृष्ण म्हणून तयार आहे, दुर्योधनाला संपवायला. लोकशाहीची जर कोणी थट्टा करत असेल तर एकच सांगतो, इफ यू आर बॅड, आय एम यूवर डॅड, असा डायलॉग शेवटी अभिजित बिचुकलेंनी मारला.
अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; पहिल्याच सभेत अजित पवारांना म्हटले दुर्योधन pic.twitter.com/ogncjpmxJG
— santosh gurav (@santosh29590931) April 20, 2024
सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी तब्बल 12 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच अभिजित बिचुकले यांचा समावेश होता. अभिजित बिचुकले यांनी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी देखील संवाद साधला.
अभिजीत बिचकुले यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिजीत बिचुकले यांनी पत्नी अनुअंकृत बिचुकले यांच्यासह दोन अनुमोदक आणि सूचक यांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत फक्त चार लोक होते. अर्जदाखल केल्यानंतर त्यांनी अजित पवारांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना दुर्योधन म्हटले. उमेदवारी अर्ज भरताना कोणतेही शक्तीप्रदर्शन केले गेल नाही. मात्र बिचकुले यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.