सातारा प्रतिनिधी । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संपू्र्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असेल ते बारामतीकडे मतदार संघाकडे. कारण या ठिकाणी विधानसभेला काका-पुतण्या असा सामना रंगणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात शरद पवार गटाचे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, पवार कुटुंबांच्या या लढाईत आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी उडी घेतली आहे. ते बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे बारामती यंदाच्या निवडणुकीत चुरसीची लढत पहायला मिळणार आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातून अभिजीत बिचुकलेंनी काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. २००४ पासून ज्या ठिकाणी आपल्याला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्याच मैदानात आता बिचुकलेंनी एण्ट्री केली आहे. बारामतीकरांनी भरभरुन मतदान करावं,असं आवाहनंही बिचुकलेंनी केलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात एकीकडे पवार काका-पुतण्यात घमासान सुरू असताना बिग बॉसफेम अभिजित बिचुकले यांनी बारामतीच्या राजकारणात उडी घेतली आहे.
सातारच्या बिचुकले यांना राज्यभरातील जनता ओळखते. त्यांनी मराठी व हिंदी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. ‘शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवतो’, असे म्हणणारे बिचुकले आता बारामतीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीच्या लढतीची वेगळीच चर्चा पाहायला मिळणार आहे. बिचुकले यांनी यापूर्वी राज्यातील अनेक मतदारसंघातून अनेक निवडणुका लढवल्या आहेत. ते आता बारामतीतून आपले नशिब आजमावत आहेत. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीतही बिचुकले यांनी उडी घेतली होती. तेथे त्यांना 47 मते मिळाली होती.
2014 च्या निवडणुकीत भाजप नेते देंवेद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना चक्की पिसायला लावू असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी पवार यांच्यासोबत पहाटेच शपत घेतली. सिंचन घोटाळ्यात अजित पवार दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, नसतील तर तसे जाहीर करून त्यांची माफी मागा, अशी मागणी अभिजित बिचुकले यांनी अर्ज दाखल केल्यावर माध्यमांशी बोलताना केली. बारामती शहर खूप सुंदर आहे. मला इथल्या जनतेने संधी दिली तर शरद पवारांपेक्षा चौपट विकास करून दाखवेन, असे ते बिचुकले यांनी म्हटलं आहे.