सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 चा काल निकाल लागला. हा निकाल महाविकास आघाडी, खा. शरद पवार यांना धक्का देणारा ठरला. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले. मात्र, या निवडणुकीत कायम चर्चेत असणाऱ्या अभिजित बीचुकले यांना किती मते मिळाली, याची चर्चा लोकांमध्ये होती. दोन मतदार संघातून अर्ज भरून निवडणूक लढविणाऱ्या बीचुकले यांना देखील पराजय पत्करावा लागला.
डॉक्टरेट झाल्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करत त्यांनी अर्ज भरला होता. बिचुकले यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. अभिजीत बिचुकले दोन मतदारसंघातून अपक्ष लढले. एक कल्याण आणि दुसरी सातारा. या दोन्ही मतदारसंघाचा निकाल आलेला आहे. कल्याण मतदारसंघातून त्यांना 1343 मतं मिळाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. त्यांना 480021 मतं मिळाली आहेत. तर सातारा मतदारसंघातून बिचकुलेंना 1282 मतं मिळाली आहेत.
त्या एका वाक्यामुळे बिचुकले चर्चेत…
मार्चमध्ये अभिजीत बिचुकले यांना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली होती. युनिव्हर्सिटी ऑफ मॅजिक अँड आर्ट्स या विद्यापीठाने अभिजीत बिचुकलेला मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. ही पदवी मिळाल्यानंतर अभिजीत बिचुकले याने आपण लोकसभा निवडणूक लढणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यावेळी बिचुकले यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्यही केलं होतं. कोण कुणाकडे तिकीट मागतंय, कोण कुणाची हुजरेगिरी करतय हा सगळ्यांचा नालायकपणा चालला आहे, याचं मला काही देणंघेणं नाही, अशी टीकाही बिचुकलेंनी केली होती.
बिचुकलेंनी यापूर्वीही निवडणुकीत आजमावलं होतं नशीब
2019 विधानसभा निवडणुकीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरें विरोधात उभे होते. या निवडणुकीत बिचुकले यांना वरळीकरांनी 647 मतं दिली होती. त्यानंतर मागच्याच वर्षी झालेल्या कसब्याच्या पोट निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना 47 मतं मिळाली होती. अभिजीत बिचुकलेनी मराठी आणि हिंदी बिग बॉसमध्येही नशीब आजमावले होते.