सातारा प्रतिनिधी । सदोष तलाठी भरती प्रक्रियेची एसआयटी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शासनाच्या सर्व विभागांच्या रिक्त जागा भरून बेरोजगार युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आज आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात बेरोजगार आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचा निकाल लागला. हा निकाल पूर्णपणे सदोष आहे. या निकालामध्ये खूप मोठे घोटाळे झाले आहेत, तसेच पेपर फुटलेले आहेत.
याचबरोबर पैसे घेवून योग्यता नसलेल्या उमेदवारांना उत्तीर्ण घोषित केले आहे. या सर्व प्रक्रियेबाबत आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करतो. या भरती प्रक्रियेची एसआयटी अथवा सीबीआय मार्फत त्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच यात दोषी असणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे.