गॅरंटीची भाषा करणारे सगळे पक्ष हे ‘आपची’ कॉपी करतात : अजित फाटके-पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सर्वात अगोदर अरविंद केजरीवाल यांनी गॅरंटी दिली आणि ती पूर्ण करून दाखवली. आज गॅरंटीची भाषा करणारे सगळे पक्ष हे आम आदमी पार्टीची कॉपी करत आहेत. खऱ्या अर्थाने जनतेच्या दारी जाणारे फक्त दिल्लीतील केजरीवाल सरकारच आहे. महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’चा फक्त इव्हेंट सुरू असल्याची टीका आम आदमी पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके-पाटील यांनी केली.

सातारा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने कराडच्या दत्त चौकात आयोजित केलेल्या जनसभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, प्रदेश सहसचिव अविनाश देशमुख, सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. धीरजसिंह जाधव यांच्यासह कराड, पाटण तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित फाटके-पाटील म्हणाले, दिल्लीमध्ये सरकारी माणूस लॅपटॉप घेऊन घरी येतो आणि दाखला देतो. त्याला ‘शासन आपल्या दारी म्हणतात. आपल्याकडे गाड्या भरून लोकं स्वागतासाठी आणायचे. सगळं प्रशासन दिमतीला लावायचं, गर्दी करायची, जाहिरात करायची, इव्हेंट करायचा, दहा कोटी खर्च करायचे आणि सांगायचं शासन आपल्या दारी. अमिष दाखवून लोकांना आणणे म्हणजे शासन आपल्या दारी नाही तर जनता आपल्या जहागिरदारीसाठी राबवण्यासारखे आहे.

आपल्याला शेतीमाल, दुधाला भाव हवा आहे. पण, निवडणुकीच्या काळात यावर चर्चा करण्याऐवजी कोणी कोणाशी गद्दारी केली, यावर सगळे चर्चा करत आहेत. महाराष्ट्राचा सातबारा नावावर असल्यासारखे सर्वजण भांडत असल्याचे सांगून फाटके-पाटील म्हणाले, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या आम आदमी पार्टीचं सरकार हवं, हे आपण ठरवलं पाहिजे. रोजगार, शिक्षण, आरोग्यासाठी काम करणारं सरकार हवं. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने उसाला ३९०० रूपये भाव दिला. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उसाला आम आदमी पार्टी ४७०० रूपये भाव देईल, असे मी जबाबदारीने सांगतो.

आज गॅरंटीची भाषा करणारे सगळे पक्ष आम आदमी पार्टीची कॉपी करत आहेत. सर्वात आधी अरविंद केजरीवालांनी गॅरंटी दिली आणि ती पूर्ण करून दाखवली. सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, शेतीमालाला हमीभाव मिळणं ही रेवडी नसून ती सरकारची जबाबदारी असल्याचे फाटके-पाटील म्हणाले.

शासकीय योजनांचा आपल्यावर भडीमार केला जातोय. पण, या सगळ्या योजना कॉन्टॅक्टरांची घरं भरण्यासाठी असल्याचा आरोप अजित फाटके-पाटील यांनी केला. हजारो कोटी जलयुक्त शिवारमध्ये गेले. कॉन्ट्रॅक्टरचे जेसीबी, पोकलेन दोन महिन्यात कर्जमुक्त झाले. परंतु, पाण्याची सोय झाली नाही. हे सरकार उद्योगपतींचं, कॉन्ट्रॅक्टरांचं, राजकीय घराण्याचं आणि त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांचं आहे. हे सरकार तुमचं आमचं नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिल्ली , पंजाबप्रमाणे रयतेचं राज्य आणण्याचा छत्रपतींचा विचार महाराष्ट्रात रूजवला पाहिजे.

तलवार म्यान करू नका. मतदानाचा अधिकार वापरा आणि सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्यांचं राज्य आणा. आपण घाण साफ करण्यासाठी झाडू वापरतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात झालेली घाण साफ करायची असेल तर आम आदमी पार्टीचा झाडूच वापरावा लागणार आहे. येणाऱ्या काळात ही भ्रष्ट राजकीय व्यवस्था बदलून युवक शेतकरी, कष्टकरी आणि महिलांसाठी काम करणाऱ्या आम आदमी पार्टीचं राज्य या महाराष्ट्रात प्रस्थापित करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.