सातारा प्रतिनिधी । मित्रांसह पोहायला गेलेला युवक बुडाल्याची घटना मेढा मोहाट पुलाजवळ वेण्णा नदीपात्रात सोमवारी सकाळी घडली. दरम्यान, दिवसभर युवकाचा शोध घेण्याचे काम सुरु होते. सिद्धेश विष्णू जवळ (वय १९, रा. जवळवाडी, मेढा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जवळवाडी (मेढा) येथील सिद्धेश जवळ हा युवक आपल्या मित्रांबरोबर सकाळी सातच्या सुमारास मेढा-मोहाट पुलावर वेण्णा नदीपात्रात पोहायला गेला होता. सर्व मित्र काठापासून साधारणतः शंभर ते दीडशे फूट आत पोहत गेले. त्या वेळी सिद्धेश सर्वात पुढे पोहत होता. अचानक तो पाण्यात बुडाला. जवळच पोहत असलेल्या मित्रांनी हे पाहिले; पण घाबरून ते माघारी फिरले. सिद्धेश जिथे बुडाला तेथून जवळूनच दक्षिण विभागाला वीजपुरवठा करणारी मुख्य लाइन गेली आहे. त्यामुळे विजेचा धक्का बसून तो बुडाला, की दम लागून पाण्यात बुडाला, याबाबत दिवसभर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू आणि ट्रेकर्सला शोधकार्यासाठी बोलावण्यात आले. दिवसभर बोटीच्या साहाय्याने अँकर, गळ व पाण्यातील कॅमेऱ्यांच्या मदतीने शोधकार्य राबविले; पण सिद्धेश सापडला नाही. संध्याकाळी सातनंतर अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.