सातारा प्रतिनिधी | मेढा-महाबळेश्वर मार्गावर आंबेघर तर्फ मेढा गावच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला समोरून भीषण धडक दिली. या अपघातात (वरोशी ता. जावली) गावातील एक तरूण जागीच ठार झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रवीण कोडीबा कासुर्डे, असं मृत तरूणाचं तर सिद्धार्थ संतोष कदम, या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं वरोशी गाव आणि मेढा परिसरावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरोशी ता जावली येथील प्रविण कोंडीबा कासुर्डे (वय ३७) हे टिव्हीएस (क्र एम. एच. ११ वाय. ५२८३) स्कुटीवरून दुध घालण्यासाठी मेढा येथे निघाले होते. त्यांची गाडी आंबेघर तर्फ मेढा येथील बस स्टॉपच्या पुढे आली असताना महाबळेश्वरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने (क्र . एम. एच. ४३ एल. ३७५०) दुचाकीला समोरून धडक दिली. या आपघातात दुचाकीवरील प्रविण कोंडीबा कासुर्डे या तरूणाचा जागीच मृत्यु झाला, तर गाडीवर मागे बसलेला सिद्धार्थ संतोष कदम (वय १७) हा गंभीर जखमी झाला. त्यास पुढील उपचारासाठी सातारा येथे नेण्यात आले आहे.
दोन्ही युवक हे गरीब कुटुंबातील असुन प्रविण हा दुग्धव्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत होता. त्याच्या पश्चात आई वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. सिद्धार्थ हा एकुलता एक मुलगा आहे. तो अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे वरोशी गावासह मेढा परिसरावर शोककळा पसरली आहे.
या अपघाताची नोंद नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी कार चालक सतीश दगडु सावले (रा. भामघर, ता जावली, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील या अपघाताचा तपास करीत आहेत.