कराड प्रतिनिधी । सुसाट मद्यधुंद कारचालकाने कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला. तर अन्य एक युवक गंभीर जखमी झाला असल्याची घटना कराड तालुक्यातील आबईचीवाडी गावच्या हद्दीत कराड – पाटण मार्गावर शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. आबईचीवाडी येथे दुचाकीस्वाराला धडक देऊन मद्यधुंद चालक त्याठिकाणी न थांबता तो तसाच पुढे गेला आणि पुढे सुपने बसथांब्यावर ग्रामस्थांनी कार अडवून चालकाला चोप दिला. अपघातप्रकरणी कारचालकावर कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केदार अशोक संकपाळ (वय १८, रा. म्होप्रे) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या वीरेंद्र नरेंद्र माने (१९, रा. म्होप्रे, ता. कराड) याच्यावर खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दीपक वसंत पवार (३९, रा. बैलबाजार रोड, शनिवार पेठ, कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील केदार संकपाळ हा शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मित्र वीरेंद्र माने याच्यासोबत दुचाकीवरून (एमएच ११ एई ३६५९) कराडच्या दिशेने येत होता. ते दोघेही आबईचीवाडी गावच्या हद्दीत आले असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच ५० यू ५७५६) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की, केदार व वीरेंद्र हे दोघेजण रस्त्यावरून दूरवर फेकले गेले. त्यामध्ये केदारचा जागीच मृत्यू झाला. तर वीरेंद्र गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालकाने कार न थांबविता तो सुसाट निघून गेला. सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुपने गावच्या हद्दीत बसथांब्यावर ग्रामस्थांनी ती कार अडवली. त्यानंतर अपघाताची माहिती कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. तर जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.